Ad will apear here
Next
माझ्या मातीचे गायन...
कुसुमाग्रज (चित्र सौजन्य : आठवणीतली गाणी)‘माझ्या मातीचे गायन’ या कवी कुसुमाग्रजांच्या कवितेचा जन्म एका वेगळ्याच उद्देशानं झालेला; पण स्वरांनी मोहरलेल्या या कवितेनं अवघ्या मराठी मनाला हलवलं आहे. आज कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी राजभाषा दिन. त्यानिमित्त ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आस्वाद घेऊ या त्याच कवितेचा...
..........
सोसायटीतल्या एका बाईचा फोन आला. पुन्हा पुन्हा आग्रह करत होत्या ‘नक्की या हं हळदी-कुंकवाला! प्लीज डू कम! यू विल एन्जॉय इट हंड्रेड पर्सेंट... या नक्की, मी वाट पहाते.’ त्या बाईंशी झालेला संवाद संपला; पण माझ्या मनात मात्र स्वत:शीच संवाद सुरू झाला होता. हळदी-कुंकू समारंभ! एक सुसंस्कृतपणे सौभाग्यसंस्कार रुजवणारा समारंभ ‘फुल टू एन्जॉयमेंट’चा कधी झाला? जाऊ दे, जास्त विचार करण्यापेक्षा जाऊन यावं. एकाच सोसायटीत राहून वैर कशाला घ्यावं? ‘पाण्यात राहून माशाशी वैर’ या म्हणीसारखं. अशी म्हण सुचल्याचं मनातल्या मनात हसूही आलं!

हळदी-कुंकू समारंभाला मी गेले आणि गेल्याबरोबर (त्यांच्या खोडकर मुलानं) दारातल्या विस्कटलेल्या रांगोळीबरोबर ‘डीजे’वर वाजवतात तशा गाण्यांच्या स्वरांनी स्वागत झालं. खदाखदा हसत त्या बाई जोरात म्हणाल्या ‘याऽ याऽ ऽ, वेलकम वेलकम.’ भुंड्या केसांच्या त्या बाईंनी नेसलेली भडक रंगाची पैठणी एकदम अंगावर आली. तिच्या केशभूषेला ती मराठमोळ्या वैभवाची खूण आजिबात शोभत नव्हती. त्यात टपोऱ्या मोत्यांची नथ आणि चंद्रकोर पाहून मला उगीचच दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या पुतळ्यांची (मॅनेक्विन्स) आठवण झाली. किती विसंगत होतं ते सगळं. हळूहळू त्या बाईंच्या मैत्रिणी (फ्रेंड्स) येऊ लागल्या. त्यांच्याबरोबर त्यांची लहान-मोठी मुलं होती. वेगवेगळ्या वयाची, म्हणजे कुणी बालवाडीत, तर कुणी पहिली-दुसरीत, तिसरी-चौथीत. एकच कल्ला झाला. ढॅण्ट ढॅण् गाणी वाजत होती. त्यामुळे सगळे जण एकमेकांशी मोठ्यानं बोलत होते. आधी म्हणे गेम्स खेळायचे होते, मग बक्षीस आणि वाण लुटायचं होतं. एका बास्केटमध्ये खूपशा चिठ्ठ्या होत्या. चिठ्ठी उचलून जे चिठ्ठीत असेल, त्याप्रमाणे कृती करायची होती. चिठ्ठी उचलण्याचा पहिला मान मला दिला. मी एक चिठ्ठी उचलली. त्यात लिहिलं होतं, ते मी मोठ्यांदा उच्चारलं ‘ऱ्हाइम्स फॉर किड्स!’ सगळ्यांनी एकच कल्ला केला. मग यजमानबाईंनी सगळ्यांना ‘सायलेन्स प्लीज’ म्हणून शांत बसवलं. ‘ऐका आता आंटी कोणतं ऱ्हाइम म्हणते ते’ असं म्हणून किलबिलणाऱ्या मुलांनाही आयांनी शांत केलं. मीही तोपर्यंत कोणतं बडबडगीत म्हणायचं याचा विचार केला आणि तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडले,

अडगुलं मडगुलं
सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा... 

एक बाई म्हणाली दुसरं, दुसरं आणखी दुसरं म्हणा...

इथं इथं बैस रे मोरा
चारा खा, पाणी पी
भुर्र ऽ ऽ उडून जा... 

एकच गलका झाला. सगळ्यांनी आनंदानं टाळ्या वाजवल्या. म्हणाल्या, ‘ही गाणी तर आम्हाला माहितीच नाहीत! आज्जी म्हणायची, पण आम्हाला नाही हो येत. मुलं प्ले ग्रुपला गेली की त्यांना जे शिकवलं जातं तेच आम्हीही म्हणतो.’ ‘बंटी, म्हणून दाखव रे पोए ऽ ऽ म.’ एकीनं म्हटलं. बंटी धिटाईनं पुढं आला आणि म्हणू लागला, ‘जॉनी जॉनी येस पप्पा...’ बाकीची मुलंही त्याच्याबरोबर ‘येस पप्पा, नो पप्पा’ म्हणत, मान डोलावत, हातवारे करत म्हणू लागली. हळदी-कुंकू समारंभाला उंची अत्तराच्या कुप्या लुटल्या. मुलांना प्लास्टिकचे खेळण्यातले मोबाइल दिले. कपाळावरच्या टिकल्यांचे आकार न बिघडतील याची काळजी घेऊन हळदी-कुंकू लावलं गेलं. बाजारातून आणलेल्या तिळाच्या वड्या दिल्या गेल्या. ती वडी देता देता यजमानीण पुटपुटली ‘घरी करायला वेळ कुठे हो, आणल्या बाहेरून!’ मनातल्या मनात मी ओळी म्हणून टाकल्या,

तिळगूळ घ्या गोड बोला
आमचे तीळ सांडू नका
आमच्याशी भांडू नका.

मी पटकन निरोप घेतला आणि घरी आले. 

ही घटना आज प्रकर्षानं आठवली याचं कारण मराठी राजभाषा दिनाचे वारे सर्वत्र वाहू लागलेत. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन आज आपण साजरा करत आहोत. कानामनात एक कविता आर्त स्वरात ऐकू येतेय,

माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाशश्रुतींनी
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे?

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात संगीतकार श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेली ही कविता आवर्जून आठवतेय. ही फक्त कविता नाहीये, गीत नाहीये, तर विश्वनियंत्याला कविराजांनी घातलेली आर्त साद आहे, ही एक प्रार्थना आहे. या प्रार्थनेतील आर्तता हृदय पिळवटून टाकणारी. आज दिवसभर कविराजांच्या इतर कवितांचं वाचन, अभिवाचन होईल, श्रवण होईल. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाविषयी चर्चा, परिसंवाद झडतील. मराठीच्या अभिजाततेबद्दल आग्रह धरला जाईल. सगळं सगळं होईल; पण इंग्रजाळलेल्या संस्कृतीचे चटके मायमराठीला अजूनही बसताहेत, नव्हे हे चटके वाढतच चाललेत असं वाटतं. सर्व मराठी जनांना जणू ‘मायमराठी’च आर्त साद घालतेय, अशी जाणीव या कवितेतून होताना दिसतेय. ‘आकाशश्रुती गोळा करून हे ईश्वरा तू कानोसा घे, माझा आवाज तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल,’ असं कवी ईश्वराला सांगत आहे; पण कवीच्या जागी आज मला मायमराठी दिसतेय. जनताजनार्दनाला जणू ती सांगत आहे.

माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाशनेत्रांनी
जरा पापणी खोलून
कधी पाहशील का रे?

जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदावरून कवी कुसुमाग्रजांनी केलेलं भाषण कुणाला स्मरत असेल, तर मायमराठीच्या आजच्या स्थितीला आपणच सारे जबाबदार आहोत, असं वाटतं. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. अवघ्या विश्वातलं ज्ञान अनुभवण्यासाठी तिचा खिडकीसारखा वापर व्हायला हवा आणि मराठी भाषा मुख्य प्रवेशद्वार बनायला हवी; पण तसं न होता अंगावर लक्तरं ल्यालेल्या एखाद्या भिकारणीच्या अवस्थेत मायमराठीला पोहोचवणारे आपणच आहोत. मायमराठीला राजवस्त्रं परिधान करण्याचं भाग्य मिळवून देणं आपलीच जबाबदारी आहे. कवी कुसुमाग्रजांनी मायमराठीला उच्चपदस्थ पाहण्याचं स्वप्न पाहिलं. ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हायला हवं. आज ही कविता ऐकताना, मातीचे गायन ऐकताना मायमराठीचेच हुंकार ऐकू येऊ लागले आहेत. हे हुंकार वेदनांचे आहेत. आपल्याच घरी आपणच पाहुणे बनल्याची भावना व्यक्त करतेय आपली मायमराठी, असं वाटतं. धूळपाटीवरची अक्षरं धुळीत मिसळून टाकायची, परकीय भाषा सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात धन्यता मानायची, यासारखं दुर्दैव ते कोणतं? आपल्या घरात, आपल्या अवतीभवती नव्या पिढीच्या तोंडी मराठीचा अभिमान वाटेल अशा शब्दांऐवजी परभाषेचा गौरव होतांना दिसतोय. दैनंदिन जगण्याची, व्यवहाराची भाषा मराठी ऐवजी इंग्रजाळलेली भाषा आपण ऐकतो. खरं म्हणजे मराठी भाषेचं सौंदर्य, तिला लाभलेला मराठी मातीचा सुगंध आणि अमृतातेही पैजा जिंकेल असा सार्थ अभिमान घराघरात संस्कारित व्हायला हवा. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ ही भावनाच किती सुंदर आहे, अवघ्या जगाला हेवा वाटेल अशी. मराठी भाषेचं महत्त्व, मराठी भाषेतलं साहित्य आणि या हृदयीचे त्या हृदयी घालण्याचं मराठीचं सामर्थ्य समजून घ्यायचं असेल, तर कवी कुसुमाग्रज आणि इतर दिग्गज मराठी लेखक, कवींचं वाङ्मय आपल्या श्वासाइतकंच गरजेचं आहे, हे पटवून देण्याची वेळ आता आलीय. अधिक गांभीर्यानं विचार व्हायला हवा. मायमराठीची साद जनताजनार्दनापर्यंत पोहोचायलाच हवी. 

वर्ख लावून कागदी
माझे नाचते बाहुले
कधी कराया कौतुक
खाली वाकशील का रे?

खरोखर कुसुमाग्रजांची ही कविता मी कितीतरी वेळा ऐकली. परमेश्वराप्रती असलेला अनन्य भक्तिभाव यापलीकडे मला काहीच जाणवलं नव्हतं; पण आज मात्र कुसुमाग्रजांच्या पावनस्मृती जागवताना या कवितेचा नवा अर्थ उमगलाय, असं वाटतंय. परकीय भाषांच्या आक्रमणामुळे मराठी भाषेचं जहाज अंधारात भरकटतंय. या जहाजाला मायमराठीच्या स्वाभिमानाचा दिवा लागायला हवा

माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा
कधी लावशील का रे?

माझा रांगडा अंधार
मेघामेघात साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी
कधी टिपशील का रे?
माझ्या मातीचे गायन... 

कवी कुसुमाग्रजांची ही कविता, तिचा जन्म एका वेगळ्याच उद्देशानं झालेला. या कवितेतल्या शब्दांनी ईश्वराला साद घातली. ती साद श्रीधर फडके यांच्या संगीतसाधनेतून, अनुराधा पौडवाल यांच्या आर्त स्वरांमधून ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचली असणार; पण या स्वरांनी अवघ्या मराठी मनाला हलवलं आहे. आणि आज तर ‘मायमराठी’चा अभिमानही जागवला आहे. जे मराठी बोलतात, मराठीतून चालतात, मराठीतून श्वास घेतात आणि जगण्यातून मराठीचा विश्वास जागवतात, त्यांना ही कविता स्वरांनी कशी मोहरली, मोहरताना ती प्रार्थनेत कशी विरली आणि आर्त स्वरांमधून मायमराठीची अस्मिता जागवण्यासाठी घराघरातून कशी फिरली याचा प्रत्यय देणारी कशी ठरली यासाठी ऐकत राहू या मराठी मातीचे गायन... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)

(कुसमाग्रजांच्या निवडक कविता अन् त्यांवरचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी https://goo.gl/UoDAaC येथे क्लिक करा. कुसुमाग्रजांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/fp3o2p येथे क्लिक करा. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZOKBL
Similar Posts
नवलाख तळपती दीप विजेचे येथ... कोजागरीचा चंद्र मावळल्यावर दिवाळीची चाहूल लागते. मनाच्या कोनाड्यात हळूच एक मिणमिणती पणती अनेक हळव्या आठवणींना जागं करते. कवी कुसुमाग्रजांची ‘स्मृती’ ही कविता नकळत ओठांवर येते. ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या त्याच कवितेचा..
प्रेम कर भिल्लासारखं... ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, नाटककार कुसुमाग्रज यांची ‘प्रेम कर भिल्लासारखं...’ ही कविता आणि सुधीर मोघे यांची ‘आयुष्यात प्रेम यावं लागतं’ ही कविता म्हणजे प्रेमाचं महत्त्व सांगणाऱ्या अन् त्याची उत्कटता व्यक्त करणाऱ्या आहेत. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून
माझ्या मराठी मातीचा... ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता आज पाहू या...
कल्पकुसुमांचा गंध कुसुमाग्रजांच्या काव्यप्रतिभेच्या लखलखत्या ज्योती पाहून आपले डोळे दिपून जातात. सर्वत्र तेजोमयी प्रकाश आणि काव्यकुसुमांच्या दरवळाने रसिकमनाचा आसमंत भारल्यासारखा होतो. ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’च्या आजच्या भागात कुसुमाग्रजांच्या ‘काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही,’ या कवितेबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language